राज्याचे राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांना गेल्या तीन-चार दिवसांपासून अंगदुखी, ताप येत आहे. यामुळे पवारांनी सर्व दौरे रद्द करून मुंबईतील घरीच विश्रांती घेतली आहे. (Deputy CM Ajit Pawar not Corona Positive)
दरम्यान, अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे एबीपी माझाला सांगितले आहे.
अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. अजितदादांच्या कोरोना चाचणीबाबत विविध चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. मात्र, बुधवारी त्यांनी दौरे रद्द केले होते. पुरामुळे बाधित रस्ते, पुलांच्या दुरुस्तीचं कामे करण्याच्या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या. पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. अजितदादांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला, परंतु खबरदारी म्हणून अजित पवार घरीच विश्रांती घेत आहेत.
सुप्रिया सुळेंनाही सांगितले दूरच थांबादरम्यान, अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी सुप्रिया सुळेंसोबतच्या बैठकीत लांब बसण्यास सांगितले होते. तसेच पवार हे स्वत:च लांबून बैठकीत मार्गदर्शन करत होते.