"मला पाडून दाखवा"; अजित पवारांचं सुधीर मुनगंटीवारांना खुलं आव्हान
By मोरेश्वर येरम | Published: December 15, 2020 03:56 PM2020-12-15T15:56:04+5:302020-12-15T15:57:41+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांना जशासतसं प्रत्युत्तर दिलं.
मुंबई
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनमध्ये यावेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. "माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा जिंकू शकत नाही", असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार सभागृहात त्यांच्या भाषणावेळी होत असलेल्या अडथळ्यावेळी म्हणाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांना जशासतसं प्रत्युत्तर दिलं.
"तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा", असं रोखठोक उत्तर अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना दिलं. सुधीर मुनगंटीवार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव, पुरवणी मागण्या, कोरोनातील व्यवस्थापन अशा विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मुनगंटीवार यांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. त्यावर "माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधीच जिंकत नाही", असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देत "तुमचं आव्हान मी स्विकारतो, मला पाडून दाखवाच", असं म्हणून मुनगंटीवारांना निरुत्तर केलं.
मुनगंटीवार-अनिल परब आमने-सामने
हक्कभंग प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवेसना सभागृहात आमने-सामने आले होते. विशेष हक्कभंगाच्या प्रस्तावावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो? असा सवाल उपस्थित केला. त्यावर अनिल परब यांनी आमदारांना विशेष अधिकार दिलेत कशाला? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाहीत का? मागील ५ वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का? सभागृह असताना कोर्टात जायचं कशाला? अशा प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली.