दोन मिनिटांत दोन वार; फडणवीसांबद्दल काय काय म्हणाले अजित पवार
By मोरेश्वर येरम | Published: December 26, 2020 01:03 PM2020-12-26T13:03:02+5:302020-12-26T13:04:32+5:30
"फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं"
पुणे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आक्रमक अंदाजात आज पुण्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
"फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं", असा टोला अजित पवार यांनी लगावला. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन देखील केलं.
शेतकरी काय वेडे आहेत का?
"कृषी कायदे जर खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे असतील तर दिल्लीत हाडं गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन कशाला करतायत?", असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. "शेतकऱ्यांसाठी आज हे बैलगाडीतून फिरतायत. शेतकऱ्यांची इतकीच काळजी असेल तर फडणवीसांनी बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीच्या थंडीत आंदोलनला बसलेल्या शेतकऱ्यांशी जाऊन बोलावं आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत", अशी टीका पवारांनी केली.
'पुन्हा येईन'नंतर आता 'परत जाईन'
अजित पवार यांनी यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना पाटील आणि फडणवीस या दोघांनाही टोला हाणला.
"एक जण म्हणतो पुन्हा येईन...दुसरा म्हणतो परत जाईन...एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं?", असं अजित पवार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात कोल्हापुरात परत जाणार असल्याचं विधान केलं होतं.