"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:22 PM2021-02-08T16:22:17+5:302021-02-08T16:25:22+5:30
devendra fadnavis slams state government over inquiry of celebrities tweets : भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते.
या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावरून भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. (devendra fadnavis slams anil deshmukh and state government over inquiry of celebrities tweets)
देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. " भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राज्य सरकारवर टीका केली आहे.
याचबरोबर, कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. तसेच, भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा, असे म्हणत या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केला आहे.
भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 8, 2021
खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.
दरम्यान, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसेच, सर्व सेलिब्रिटीचे ट्विट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.