Devendra Fadnavis Mahayuti: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना आयएएनएस वृत्तसंस्थेने ओपिनियन पोल केला असून, त्यात महायुतीच्या बाजूने कौल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
नागपूरमध्ये प्रचार रॅली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओपिनियन पोलच्या आकड्यांबद्दल फडणवीस म्हणाले, "हे बघा आम्ही सर्व्हेच्या आधारावर जगणारे लोक नाही. एखादा सर्व्हे चांगला येतो, एखादा वाईट येतो. हा चांगला आलाय. सर्व्हे काही असो, जनतेचा फील आम्हाला येतोय. जनता आमच्यासोबत आहे."
अजित पवार म्हणाले, "आमचं म्हणणं महायुतीला १७५ पेक्षा जास्त जागा मिळतील. त्या करिता आम्ही प्रत्येकजण महायुतीचे नेते प्रयत्न करतोय. तशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे", असे अजित पवार म्हणाले.
महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल -गोयल
या ओपिनियन पोलबद्दल बोलताना पियूष गोयल म्हणाले, "वेगवेगळ्या ठिकाणांवरून जी माहिती येत आहे, त्यातून स्पष्ट कळत आहे की, महायुती आता खूप पुढे गेली आहे. येणाऱ्या दिवसात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह, जेपी नड्डा हे दौरे करतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे महाराष्ट्रात फिरत आहेत. आणखी चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. महायुती प्रचंड बहुमताने महाराष्ट्रात विजयी होत आहे", असे गोयल म्हणाले.
IANS and Matrize Opinion Poll यांनी ओपिनियन पोल केला असून, त्यात महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला १४५ ते १६५ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस-शिवसेना यूबीटी-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.