ठाणे - शाळा सुरु करण्याच्या संदर्भात सरकार , टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे . मंत्री वेळी वेगळी घोषणा करतात, सरकार वेगळी घोषणा करते आणि टास्कफोर्स काही तरी तिसरंच ठरवते यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्यामुळे एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी ठाण्याच्या कोपरी उड्डाणपुलाच्या कामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संस्कार स्टडी क्लाउड लोकार्पण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात आले होते. आमदार संजय केळकर यांच्या वतीने ठाण्यातील मो.ह विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी कोपरी पुलाची पाहणी केली. यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्कफोर्सच्या कारभाराबाबत न नाराजी व्यक्त केली. शाळा कधी सुरु होणार याबाबत आधीची पालक वर्गात कमालीचा संभ्रम आहे. या संभ्रमध्ये भर पाडण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोपरी उड्डाणपुल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार .. कोपरी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून या पुलाची पाहणी देखील फडणवीस यांनी केली. तसेच पुलाच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले आहे. हा पूल आठ लेनचा होणार असल्याने या पट्यातील वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले.