Devendra Fadnavis Meet Sharad Pawar: राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार-फडणवीस भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर पवारांसोबतच्या भेटीचा फोटो ट्विट करुन याची माहिती दिली आहे. फडणवीसांनी यावेळी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. पण याभेटीमागे अनेक कारणं असल्याचं बोललं जात आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सध्या पेटला आहे. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नुकतंच आक्रमक भूमिका घेतली. संभाजी राजे यांनी राज्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर राज्य सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या असून त्यासाठी ६ जूनपर्यंतची अंतिम मूदत दिली आहे. संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी आरक्षणावरुन कोर्टानं दिलेल्या निर्णयावरुनही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार असून गेल्या १५ महिन्यांमध्ये या प्रश्नाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसी समाजाला आजचा दिवस पाहावा लागल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.