मुंबई – कर्नाटक विधानसभेतील भाजपा आमदार रमेश जारकिहोली यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कर्नाटकातील राजकीय स्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. येडियुरप्पा सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. आमदार भाजपात नाराज आहेत असं रमेश जारकिहोली यांनी म्हटलं आहे. रमेश जारकिहोली आमदारकीचा राजीनामा देण्याच्या विचारात होते परंतु हा निर्णय तुर्तास त्यांनी टाळला आहे.(Congress is a sinking boat, I don't even think about joining it again: BJP MLA Ramesh Jarkiholi)
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर रमेश जारकिहोली म्हणाले की, मला पुन्हा मंत्री बनण्यात रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. आरएसएस आणि भाजपाने मला जो सन्मान दिला आहे तो काँग्रेसमध्ये मला २० वर्षात कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडती नौका आहे त्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याचा विचारही करत नाही. मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत होतो परंतु वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तुर्तास हा निर्णय घेत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मी आता उघडपणे बोलू शकत नाही, मी खुश नव्हतो म्हणून राजीनामा देण्याचा विचार करत होतो. मी राजकारणातून राजीनामा देईन पण आता नाही. भाजपा आणि आरएसएसनं मला सन्मान दिला. कोणत्याही किंमतीत काँग्रेसमध्ये परत जाणार नाही. भलेही काँग्रेसनं मला मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला तरी जाणार नाही. जर राजीनामा दिला तरी भाजपात राहीन, कोणीतरी म्हणतं मी काँग्रेसमध्ये जाणार. पण मी याचा विचारही केला नाही असं रमेश जारकिहोली यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
त्याचसोबत काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचण असल्याने मी सार्वजनिक बोलू शकत नाही. बीएस येडियुरप्पा ना केवळ त्यांचा कार्यकाल पूर्ण करतील तर ते पुढील निवडणुकीत पक्षाचा प्रमुख चेहराही असतील. जर माझे विरोधक हा विचार करत असतील मी राजीनामा दिल्यानंतर माझे कुटुंब राजकारणातून बाहेर जाईल तर ते चुकीचं आहे. माझा भाऊ आणि मुलंही आहेत. वाघ जितका ताकदवान असतो तितके ते आहेत. मी चिंतीत नाही. मी लढत राहीन असं रमेश जारकिहोली म्हणाले.
कोण आहेत रमेश जारकिहोली?
सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रमेश जारकिहोली एक ताकदीचे मंत्री होते. हे त्या १७ आमदारांपैकी एक होते जे २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आले होते. गोकक येथील आमदार रमेश जारकिहोली हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. राज्यात काँग्रेस-जनता दल सरकार कोसळणं आणि भाजपाची सत्ता आणणं यामागे रमेश जारकिहोली यांची महत्त्वूपर्ण भूमिका होती. रमेश जारकिहोली हे राज्यातील बड्या राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ते मोठे साखर व्यावसायिक आहे. काही महिन्यांपूर्वी रमेश जारकिहोली यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. रमेश जारकिहोली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजपाची बदनामी झाली होती.