नाशिक – केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार(Cabinet Expansion) बुधवारी दिल्लीत पार पडला. तब्बल ४३ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात महाराष्ट्राच्या ४ मंत्र्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. नारायण राणे(Narayan Rane), कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यात गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होतं.
प्रीतम मुंडे दिल्लीत असल्याच्या बातम्यांना पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी ट्विटरवरून खोटं असल्याचं सांगत आम्ही मुंबईच्या निवासस्थानी आहोत असं म्हटलं होतं. त्यानंतर प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाही त्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आता वेगळा मार्ग निवडावा लागेल असं म्हटलं होतं. या सर्व घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने दोन्ही भगिनी नाराज आहेत अशी चर्चा आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंडे भगिनी नाराज असल्याचं तुम्हाला कुणी सांगितले? उगाच काहीही बदनामी करू नका. भाजपामध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतो. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका. राज्यातील ४ लोकांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना चांगली खातीही देण्यात आली आहे. या खात्यांचा महाराष्ट्रासाठी चांगला फायदा होईल. नाशिक जिल्ह्याला ५० वर्षानंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेना भाजपा युतीबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सावध भूमिका घेतली. चर्चेवर कुठलेही निर्णय होत नसतात. विविध चर्चा असतात. नारायण राणे त्यांच्या क्षमतेवर मंत्री झालेत. यात बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भाजपला ओबीसी चेहऱ्याचा विसर पडला
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान (Cabinet Expansion) न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो या मंत्रिमंडळात नाही आहे, असे शेंडगेंनी म्हटले आहे.