मुंबई: नुकतच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबतील कार्यालयात शक्तीप्रदर्शन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत बोलताना पंकजा यांनी 'माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा' असल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं. त्यावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारुन डावलल्यानंतर पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं होतं. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी पंकजा यांनी मुंबईतील कार्यालयात बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांची नावं घेतली. पण, राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं. यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, 'मी राष्ट्रीय पातळीवर काम करते. माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत', असं म्हणत राज्यातील नेत्यांना डावललं. विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले फडणवीस ?देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केले, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, पंकजां मुंडेचं भाषण ऐकण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. तसेच, आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासेही केलेत. त्यावर आता मी बोलण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत विषयाला पूर्णविराम देण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?मुंबईतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे. माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करते जोवर शक्य आहे. मी कुणालाही भीत नाही, निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्यांचा कधीही अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी काही नको, तुमच्यासाठी हवे आहे. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझे ऐका, आपण कष्टाने बनवलेले घर का सोडायचे. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू, असेही यावेळी पंकजा म्हणाल्या.
माझे नेते मोदी... माझे नेते अमित शाह... पंकजा म्हणाल्या, माझा नेता मोदी… माझा नेता अमित शाह… आणि माझा नेता जे.पी. नड्डा हे आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. आपल्याला काय, मला माझ्यासाठी काही नको. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे…? तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.