Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:27 IST2021-07-27T16:27:31+5:302021-07-27T16:27:44+5:30
Devendra Fadnavis to Sharad Pawar: 'दौऱ्यांमुळे शासकीय यंत्रणेचं काम वाढतं, त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं.'

Maharashtra Flood : 'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
मुंबई: नैसर्गिक संकट येतं तेव्हा मदतकार्य करणं गरजेचं असतं. पण, अशा प्रकारचे दौरे केल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते, ते योग्य नाही. ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये.
पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या आवाहनाबाबत फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवारांनी जे काही आवाहन केलंय, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथ नसतेच. सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे,' असं फडणवीस म्हणाले.
तसचे, 'आमचे दौरे गरजेचे आहेत. आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारसमोर मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. बाकी विरोधी पक्षनेता म्हणून जो दौरा करण्याची आवश्यकता आहे, ते मी करणारचं', असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते शरद पवार ?
शरद पवार आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांकडून होणारे पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याचं आवाहन केलं. माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. आता शासकीय यंत्रणा पूनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावेत. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली गेली ते दहा दिवसांनंतर आले. त्यामुळे कोणत्याही नेत्यंनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रण फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही, असं पवार म्हणाले.