पुणे : पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. पाटील यांना कोल्हापूर सोडून पुण्यातील सेफ मतदारसंघ निवडल्याच्या आरोपांना नेहमी सामोरे जावे लागते. यामुळे पाटील यांनी विरोधकांना पुढील निवडणूक कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे प्रत्यूत्तर दिले आहे.
पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 'पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते, प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते', असा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी करताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ' नाही मी जाणार, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, माझ्या विरोधकांनाही सांगून टाका', असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळची विधानसभा निवडणूक कोल्हापूरऐवजी पुण्याच्या कोथरुडमधून लढविली होती. यावेळी त्यांनी सेफ मतदारसंघ निवडल्याचे आरोप झाले. तसेच निवडणुकीवेळी परका उमेदवार दिला, भाजपाला पुणेकर भेटला नाही का असाही प्रचार केला गेला. या निवडणुकीत पाटील विजयी झाले असले तरीही त्यांच्यामागे परक्याचा शिक्का कायमचा लागला आहे. यावर पाटील यांनी मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे वक्तव्य देखील केले होते. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.
मुश्रीफांच्या नेहमीच निशान्यावरमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संकटात भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. सुशांतसिंग राजपूत, कंगना प्रकरणात तर महाराष्ट्राचा अपमान केला. मात्र या निवडणुकीतून जनतेने त्यांना चोख उत्तर दिले. त्यांचे बालेकिल्ले ढासळले असून विजय विनयाने स्वीकारला पाहिजे. सत्तेची आणि संपत्तीची मस्ती फार काळ टिकत नाही. माझे आणि चंद्रकांत पाटील यांचे बांधाचे भांडण नाही; मात्र सत्तेत असताना ते माझ्याशी सुडाने वागले.
राजकीय व सामाजिक जीवनातून मला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चूक कबूल करावी आणि या प्रकरणावर पडदा टाकावा असे आवाहन केले होते. एकटे-एकटे लढण्याची भाषा आता चंद्रकांत पाटील करीत आहेत. कसे लढायचे ते आम्ही ठरवू. हा निकाल पाहिल्यानंतर ईव्हीएम मशीन असते तर असे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हटले असते. तिन्ही पक्षांचे असेच मनोमिलन झाले तर यापेक्षाही चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.