लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी केली. त्या पत्रपरिषदेत बोलत होत्या.धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा पंकजा यांनी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्याही धनंजय यांचे वर्तन अयोग्य असल्याची टीका केली होती. मात्र, आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल्या. पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असेल तर वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. सध्या राजकीय नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने यासाठी एक वेगळी यंत्रणा अशा प्रकरणाच्या तपासणीसाठी असावी का असेही वाटू लागले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाखाली होऊ नये, सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.
पूजा प्रकणातील क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणे यंत्रणेचे काम आहे. या प्रकरणावरून कोणतेही राजकारण होता कामा नये, राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असे नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या.