मुंबई : काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेवून जाणारा पक्ष असून भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटले आहे. यामुळे आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहिल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे. (Shiv Sena's Ex MLa Sharad Patil rejoins Congress in Presence of Nana Patole)
गांधी भवन येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील (Sharad Patil) यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना पक्षातील शेकडो सदस्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदीवासी विकास मंत्री के. सी, पाडवी, कार्याध्यक्ष नसिम खान, ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, देवानंद पवार, प्रकाश सोनावणे आदी उपस्थित होते.
पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम केले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा असे, आवाहन करून शरद पाटील यांच्यासह पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे त्यांनी काँग्रेस परिवारात स्वागत केले.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल उत्तम सुरु असून काँग्रेसला महाराष्ट्रात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी सर्वजण त्यांच्यासोबत आहेत. भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असेही थोरात म्हणाले.