Babri Masjid Verdict: बाबरी खटल्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड
By प्रविण मरगळे | Published: September 30, 2020 10:25 PM2020-09-30T22:25:20+5:302020-09-30T22:29:01+5:30
या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ट लोकांनी अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म्हणाले.
मुंबई – १९९२ मधील बहुचर्चित बाबरी मशीद खटल्याचा सीबीआयच्या विशेष कोर्टाने आज निकाल दिला. यात ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली, गेल्या अनेक वर्षापासून हा खटला सुरु होता. आज या खटल्याचा निकाल लागल्याने सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र या निकालावरून राज्यातील महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
या निकालाचं काँग्रेस-राष्ट्रवादीनं विरोध केला असून शिवसेनेनं स्वागत केलं आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, बाबरी खटल्याचा निकाल सीबीआय कोर्टाने दिला, या २८ वर्षात देशाचं राजकारण बदललं आहे, यातील प्रमुख नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, बाळासाहेब ठाकरे, उमा भारती, यासारखे अनेक नेते निर्दोष सुटले आहेत. बाबरी पाडण्याचा प्रकार कट नव्हता, ती अचानक घडलेली घटना किंवा अपघात होता असं सीबीआय कोर्टाने म्हटलं आहे. या निर्णयाची अपेक्षा देशाला होती, समस्त हिंदूंना होती अशी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे.
सीबीआयच्या निकालानंतर आश्चर्य वाटत नाही - राष्ट्रवादी
बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले आहे. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर अगोदर देशभरात झालेले कार्यक्रम आहेत. त्याच आधारावर केस तयार करण्यात आली होती. शेवटी हा न्यायालयाचा निकाल आहे त्याचा आम्ही आदर करतो असं सांगत राष्ट्रवादीने सावध प्रतिक्रिया दिली आहे.
बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक - काँग्रेस
बाबरी मशीद खटल्याचा निकाल हा अत्यंत धक्कादायक व अनपेक्षित असल्याचं मत मुंबई शहराचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी व्यक्त केलं. अस्लम शेख म्हणाले की,बाबरी मशीद पाढण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून एक राष्ट्रव्यापी मोहिम छेडण्यात आली होती. काही लोक मशीद पाडण्यासाठी सोबत औजारेसुद्धा घेऊन गेले होते.अनेक वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांनी पुराव्यांसह या घटनेचं वार्तांकनही केलं होतं. असं असताना अशा प्रकारचा निर्णय येणं अनपेक्षित आहे. सीबीआय साक्षीदार व पुरावे देण्यात कमी पडलं. यापुढे तरी देशात अशा प्रकारची देशाच्या ऐक्याला तडा जाईल अशी घटना घडू नये यासाठी देशातील सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी दक्ष असायला हवं असं मत शेख यांनी व्यक्त केलं.
तर बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भिती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात हजारो निष्षापांचा बळी गेला. १५ लाख लोक अयोध्येला जमा झाले होते. ते कोणाच्या नेतृत्वाखाली तिथे आले होते? या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ट लोकांनी अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म्हणाले.
देशाच्या लोकशाहीसाठी काळा दिवस – समाजवादी पार्टी
देशाच्या लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे, १९९२ बाबरी मस्जिद जबरदस्तीनं पाडण्यात आली, संपूर्ण जगाने ते पाहिलं, हा खटला अनेक वर्षापासून सुरु आहे. आमचा कायद्यावर विश्वास आहे, पण जेव्हा पासून दिल्लीत मोदी सरकार आलं आहे. तेव्हापासून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस यांना मोदी आणि अमित शहांनी बाहुले बनवले आहे, बाबरीचा निकाल आला तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले बाबरी मस्जिद पडली ते चुकीचं झालं, पण इतकी मोठी मस्जिद पाडली त्यात पुरावे मिळाले नाहीत, आता या देशात हेच होणार आहे असा आरोप आमदार अबू आझमींनी केला आहे.