मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्हिडीओने मुंबईकरांचीही उत्सुकता वाढवली आहे. यामुळे काळाचौकी येथे होणाºया मनसेच्या पहिल्या सभेचीच चर्चा सर्वत्र सुरू होती. आज कुठला व्हिडीओ लावणार? याबाबत गप्पा रंगत होत्या. आजूबाजूच्या इमारतींतील रहिवासी शहीद भगतसिंग मैदानात उतरले होते. ‘ए, लावरे तो व्हिडीओ’ लिहिलेले टी शर्ट घालून फिरणाºया कार्यकर्त्यांनी उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवली.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देत मनसेने खळबळ उडवून दिली. त्यानंतर सरकारी योजनांची वस्तुस्थिती व्हिडीओंद्वारे मतदारांसमोर मांडण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्यामुळे मुंबईतील मनसेच्या पहिल्या सभेबाबत गेले काही दिवस सामाजिक व राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली होती. या उत्सुकतेची प्रचिती काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात आज आली. मैदानाच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर दोन्ही बाजूंना फडकणारे झेंडे, अधूनमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष कार्यकर्ते करीत होते.मात्र मैदानातील खुर्च्या संध्याकाळपर्यंत रिकाम्याच दिसत असल्याने मुंबईतील सभा फेल जाण्याची भीतीही व्यक्त होत होती. मात्र ‘आले आले मनसे’ आणि ‘प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतांनी वातावरण भारावून गेले. राज ठाकरे यांचे आगमन होईपर्यंत मनसेच्या शिवडी विधानसभेतील प्रतिनिधींनी भाषणे ठोकली. त्यामुळे गर्दी हळूहळू वाढू लागली, कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिक पुरुष व महिलावर्गानेही मैदानात हजेरी लावली. तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर साडेआठ वाजता राज ठाकरे यांचे आगमन झाले आणि ‘कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला’ हा जयघोष सुरू होत फटाक्यांच्या आतशबाजीतच भाषणाला सुरुवात झाली.टी-शर्टही ट्रेंडिंगमध्येराज ठाकरे त्यांच्या भाषणात अधूनमधून व्हिडीओ लावतात त्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना ते व्हिडीओ लावण्यासाठी देत असलेले आदेश ‘ए, लावरे तो व्हिडीओ’ हे वाक्य प्रचंड गाजले आहे. या वाक्याचे ट्रेंडिंग मनसेनेही आता सुरू केले आहे. म्हणूनच मुंबईतील या पहिल्या सभेत कार्यकर्ते ‘ए, लावरे तो व्हिडीओ’ लिहिलेले टी शर्ट घालून मैदानात फिरताना दिसले. त्यामुळे हे टी शर्ट मिळावे यासाठी काही तरुणांची या कार्यकर्त्यांकडे चौकशी सुरू होती.
‘लावरे तो व्हिडीओ’चीच चर्चा आणि उत्सुकताही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 5:53 AM