मुंबई - राज्यात भयावह वेगाने वाढत असलेला कोरोना विषाणू आणि दुसरीकडे सचिन वाझे व परमबीर सिंग प्रकरणात दररोज होत असलेले नवनवे गौप्यस्फोट होऊन आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Discussion between MNS Chief Raj Thackeray and Chief Minister Uddhav Thackeray through Zoom app, Aditya Thackeray also participated)
यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तात करण्यात आलेल्या दाव्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये झूम अॅपच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याचे तसेच या चर्चेमध्ये आदित्य ठाकरे हेसुद्धा सहभागी झाल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांबाबत चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेदरम्यान इतर कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली. हे मात्र कळू शकलेले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील फोनवरून चर्चा केली होती. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सहाकार्य करण्याच आवाहन केले होते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर आपण सर्वांनी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन मनसेने केले होते.