बी एम काळे
जेजुरी - जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानाकडून जेजुरी गडावर उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या १२ फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी दि.१३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे, या कार्यक्रमाला छत्रपती खा. संभाजीराजे, होळकर घराण्याचे युवराज यशवंतराजे हेदेखील उपस्थित राहणार आहेत, मात्र तत्पूर्वी यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.(BJP MLA Gopichand Padalkar Target NCP Sharad Pawar)
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह आज पहाटे साडेपाच वाजता जेजुरी गडावर पोहचले, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि मार्तंड देव संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. कार्यकर्त्यानी चौथऱ्यावर जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतळ्याच्या चौथऱ्यावर त्यांना जाऊ दिले नाही. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पडळकर यांनी पुतळ्यासमोरच जाहीर सभा घेत शरद पवार आणि अहिल्यादेवी यांच्या व्यक्तिमत्वात खूप फरक आहे. शरद पवार यांच्या सारख्या भ्रष्ट नेत्याच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन होणे म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान असल्याचं सांगत त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे यांनी मात्र पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण उद्याच ठरलेल्या वेळी शरद पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण नाही – पोलीस
जेजुरीत अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण नाही. कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. मार्तंड देव संस्थानच्या वतीने जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण उद्याच शनिवारी ठरलेल्या वेळी खा शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आमदार पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिल्यादेवींच्या दर्शनाचा आग्रह धरला होता. मात्र पुतळ्याचे अनावरण उद्या होणार असून त्यानंतर दर्शनासाठी पुतळ्याचे लोकार्पण होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. यावर स्टंटबाजी करीत आ गोपीचंद पडळकर व इतरांनी घोषणा देत पुतळ्याचे अनावरण केल्याचं म्हटलं. पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याने या ठिकाणचे सर्व फुटेज तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.