महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद?; भास्कर जाधव यांच्या मागणीला थोरातांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 04:02 PM2021-07-10T16:02:24+5:302021-07-10T16:06:11+5:30
संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेकडे असणारं वनखातं रिक्त आहे. हे पद काँग्रेसला द्यावं आणि त्याबदल्यात विधानसभा अध्यक्षपद घ्यावं अशी चर्चा सुरू आहे असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्यामुळे सर्वत्र भास्कर जाधवांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यातच विधानसभा अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून घेण्यात यावं अशी मागणी शिवसेनेत होत आहे.
याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी अधिवेशन पार पडलं. विधानसभेचे अधिवेशन गाजवलं की नाही हे आता कळतंय. विधानसभा अध्यक्ष म्हणून बसण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. विधानसभा अध्यक्ष पदावर चर्चा सुरू आहे. भास्कर जाधवांना विधानसभा अध्यक्ष केल्यास सभागृह सांभाळू शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेकडे असणारं वनखातं रिक्त आहे. हे पद काँग्रेसला द्यावं आणि त्याबदल्यात विधानसभा अध्यक्षपद घ्यावं अशी चर्चा सुरू आहे असल्याचं ते म्हणाले.
परंतु विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. आत्ताच्या मंत्रिमंडळात ३ अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदं देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं वर्तमान पत्रात वाचलं. तेव्हा शिवसेनेकडे असलेले मदत पुनर्वसन खाते वडेट्टीवार यांना शिवसेनेने दिलं आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्री आमचेच आहेत. परंतु खात्यांची तुलना झाली तर लोकहिताची खाती नगरविकास खातं सोडलं तर शिवसेनेकडे थेट जनतेशी संपर्क असलेले कोणतंही खातं नाही. भाजपाला दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले होते. तेच ध्येय ठेऊन शिवसेनेचे वनखाते शिवसेनेकडेच ठेवावं आणि त्यांना वाटलं की भास्कर जाधवांना अध्यक्षपद द्यावं तर मी त्यांच्या अपेक्षांना खरं ठरेन असं भास्कर जाधव म्हणाले.
भाजपानंही माझ्या कामाचं कौतुक केले
प्रत्येक अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळ नियमावली सदस्यांनी वाचावी, नव्या सदस्यांनी सभागृहात बसून हे नियम शिकले पाहिजे. भाजपानेही माझं कौतुक केले. कटू प्रसंग येतात, माझंही निलंबन केले होते. मी रागावलो नव्हतो ते का रागावले माहिती नाही. भाजपाच्या अनेक लोकांनी माझं भरभरून कौतुक केले. अधिवेशनाच्या शेवटी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरत त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माझ्यात चांगल्या गप्पा झाल्या. आम्ही एकमेकांशी विचारपूसही केली असं भास्कर जाधवांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास...
शिवसेनेकडे असलेले मंत्रिपद पक्षाकडेच राहिलं आणि तिन्ही पक्षांनी मला अध्यक्षपदाची संधी दिली तर मी विधानसभा अध्यक्षपदाला साजेसे काम केले. कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही असं वागेन, विधानसभा अध्यक्षपद घेताना मंत्रिपद शिवसेनेने देऊ नये ही माझी भूमिका आहे. मला पक्ष जी भूमिका देईल ती मी सांभाळेन. विधानसभा अध्यक्षपदी बसल्यावर सरकार आणि पक्षीय भूमिका घेता येणार नाही. सभागृहात समतोल साधण्याचा प्रयत्न करेन असं भास्कर जाधव म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा कायम
भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून चांगले काम केले असले तरी काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव आहेत असं सांगत विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा कायम असल्याचं काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.