मुंबई – एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. नाना पटोले यांनी स्वत:च्या सरकारवरच पाळत ठेवण्याचे गंभीर आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यातच आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी मागील काही दिवसांत घेतलेली सावध भूमिका आगामी राजकीय युतीचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
आमदार नितेश राणे यांचा शिवसेना विरोध नरमला का? असा प्रश्न पडण्यामागे एक कारण म्हणजे आज नितेश राणे यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं एक विधान. ज्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हेच नितेश राणे ज्यांनी भाजपाच्या प्रतिविधानसभेत काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद नवीन नाही. राणे हे आक्रमक व्यक्तिमत्व आहे. एकदा शब्दाचा बाण सुटला की सहजा सहजी ते मागे घेत नाहीत. त्यातूनही ती टीका ठाकरे कुंटुंबीयांवर असेल, तर शक्यता कमीच आहे. पण यावेळी नितेश राणे यांनी थेट ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले होते. नितेश राणेंनी अचानक नरमाईची भूमिका का घेतली? हा प्रश्न अनेकांना पडला. विशेष म्हणजे ज्या दिवशी नितेश राणे यांनी हे ट्वीट केलं, त्याच दिवशी नारायण राणे(Narayan Rane) यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. पण आज तर नितेश राणे यांनी जाहीर व्यासपीठावरून, खाद्याला खांदा लावून काम करण्याची भाषा केली आहे.
सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी हे भाषण केलं, तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. हे विशेष. सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमात नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आता युतीच्या चर्चा रंगल्यात. नितेश राणे म्हणाले. एखाद्या विकासकामासाठी, जिल्ह्याच्या भल्यासाठी जर आमच्या पक्षाच्या नेतृत्वानं सांगितलं तर कुणासोबतही एकत्र येण्याची तयारी आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू असं नितेश राणे म्हणाले. नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राणेंचा शिवसेना विरोध हा अधिक तीव्र होईल, असं म्हटलं जात होतं. पण या दोन घटना सध्या तरी वेगळंच चित्र दाखवतायत. राणे शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका का घेतायत? खांद्याला खांदा लावून काम करण्याची भाषा का करतायत? शिवसेना-भाजप युतीसाठी सुरु असलेल्या चर्चा कधीही पूर्णत्वास येतील आणि कधीतरी पुन्हा एक होऊन काम करावं लागेल, हे नितेश राणे यांच्या लक्षात आलंय का? की सहजच नितेश राणे यांनी युतीबाबतचे संकेत समोर दिले आहेत. या राजकीय गणिताबद्दल इतक्यात सांगणं कठीण आहे, राज्यातल्या राजकीय घडामोडीही काही स्पष्टता देत नाहीयेत. त्यामुळे आता राणे शिवसेनेच्या बाबतीत एकाएकी का नरमले. खांद्याला खांदा लावून काम करण्याची भाषा का करु लागलेत. याचं ठोस कारणं मिळणं कठीण आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय स्थितीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलं आहे.
महाविकास आघाडीत वाद
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी गंभीर वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप पटोलेंनी केला आहे.