ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:39 PM2024-09-19T13:39:54+5:302024-09-19T13:44:03+5:30
MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
Sanjay Dina Patil : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीलाउच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रातील एका चुकीवर बोट ठेवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
संजय दिना पाटील यांनी शिवसेनेकडून (यूबीटी) लोकसभेची निवडणूक लढवली होती. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला होता.
खासदारकी रद्द करण्यासाठी कुणी केली आहे याचिका?
संजय दिना पाटील यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ज्या व्यक्तीने केली आहे तिचे नाव आहे शहाजी एन. थोरात. शहाजी थोरात टॅक्सी चालक म्हणून काम करतात. थोरात यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि पराभूत झाले होते.
खासदारकी रद्द करण्याच्या मागणीचे कारण काय?
शहाजी थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. उमेदवारी अर्ज भरताना वडिलांच्या नावासोबतच आईच्या नावाचा उल्लेख करणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केलेले आहे. मात्र पाटील यांनी शपथपत्रात आईचे नाव लिहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरतो. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या पीठाने बुधवारी (18 सप्टेंबर) मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना समन्स बजावले आहे. या याचिकेवर समन्स बजावण्यात आलेल्या उमेदवारांनी भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. संजय दिना पाटील यांनी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा २९ हजार ८०० मतांनी पराभव केला होता.