काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घाईगडबडीत घेतला होता त्याच प्रमाणे सरकार आता सरकारी संपत्तींच्या विक्रीचा निर्णय घेत आहे. सरकारनं घाईगडबडीत निर्णय घेण्यापासून वाचलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या."भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाची सुरूवात ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्रीपासून झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पुढचा विचार करून नोटबंदीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये २ टक्क्यांची घरसण होईल असं संसदेत म्हटलं होतं. परंतु त्यांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे नाकारला. आज देश त्या नोटबंदीच्या झळा सोसत आहे. जीएसटीनंदेखील अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था अधिक खोलात जात आहे," असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यांनी द हिंदू या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.
निर्गुतवणुकीऐवजी खासगीकरण"यापूर्वीच्या सरकारांनी अनेक दशकांच्या मेहनतीनं उभ्या केलेल्या कंपन्या आणि जनतेची संपत्ती घाईगडबडीत विकून सरकार खजाना भरण्याच्या विचारात आहेत. सरकारनं निर्गुतवणुकीऐवजी खासगीकरणाचं धोरण अवलंबलं आहे," असंही त्या म्हणाल्या. एलआयसी आणि त्याच्या प्रस्तावित आयपीओद्वारे सरकारचा हिस्सा विकणं भारतातील विमा क्षेत्रातील या अग्रगण्य कंपनीला खासगी कंपनीच्या हाती सोपवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे का? खासगीकरण केल्यानंतर ऐतिहासिक रूपानं समाजातील आरक्षण आणि काही घटकांना मिळणारी संधीही संपणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. एनपीएवरूनही घेरलंएनपीएवरूनही सोनिया गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. "या सरकारच्या कार्यकाळात देशाचा पैसा घेऊन पलायन करणाऱ्या लोकांची संख्या वेगानं वाढली आहे. हे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण करू पाहत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.