मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करा, गर्दी करू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. यात दिवाळीत भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या "भाऊबीज" या सणानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी ऑनलाइन भाऊबीज साजरी केली. भायखळा येथील महापौर निवासस्थानी कोरोना काळात सदैव साथ देणाऱ्या विविध क्षेत्रातील २१ भावांसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून "भाऊबीज" साजरी करण्यात आली.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भाऊ ऑनलाइन उपस्थित असताना महापौरांचे पती किशोर पेडणेकर व मुलगा साईप्रसाद पेडणेकर तसेच वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे हे "भाऊबीज" कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. महापौरांनी सर्वप्रथम लाल पाण्यामध्ये चेहरा बघायला सांगून त्यांची नजर उतरविली. त्यानंतर टिळा लावून औक्षण केले. त्यानंतर लाडू भरविला व आपण जी "भाऊबीज" भेट मला देणार आहात, ती मला न देता महापौर निधीसाठी जमा करण्याचे आवाहन केलं.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हणाल्या की, यावर्षी पाडवा व भाऊबीज एकत्र आले असून नवरा व भाऊ हे दोघेही स्त्रीचे रक्षणकर्ते आहे. प्रथम नवरा किशोर पेडणेकर यांना ओवाळल्याचे महापौरांनी सांगितले. यावर्षीची "भाऊबीज" ही ऑनलाइन साजरी करावे लागत असल्यामुळे सदैव स्मरणात राहणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे मला मुंबईच्या महापौरपदाची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात मुंबईकर नागरिकांची सेवा करता येणे हे माझे भाग्य असून याकाळात मुंबईचे रक्षणकर्ते म्हणून डॉक्टर,परिचारका व कक्ष परिचर यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. त्यातील प्रातिनिधिक डॉक्टरांना आज मला "देवदूत भाऊ" म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान असल्याचं महापौर म्हणाल्या. कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली असून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भावांना मी आज ओवाळले आहे. सर्व मुंबईकर नागरिकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत असून नागरिकांनी कोरोना काळातील सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला उत्सव घरच्या घरी साजरा करावा,असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यानिमित्ताने केले आहे.