'डॉक्टर, काहीही करा, जालिंदर दादांना बरे करा!' बालपणीच्या 'ड्रायव्हरसाठी' अजितदादा कळवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:41 PM2021-02-08T19:41:02+5:302021-02-08T19:42:03+5:30
Ajit Pawar Emotional : जालिंदर शेंडगे हे अजित पवार यांच्या लहानपणापासून पवार कुटूंबाच्या सेवेत आहेत. ‘अजितदादा’ लहान असताना त्यांना सायकलने शाळेत पोहोचवण्याचे काम शेंडगे करत होते.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची स्टाईल, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता,कामाची धडाडी यांची नेहमी चर्चा होते. त्यांच्या रोखठोक
स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, आज त्यांचा हळवेपणा अधोरेखित करणारी पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी सोशल मिडीयावर पवार यांच्या हळवेपणाचा पैलू उलगडला आहे. (Ajit Pawar gets Emotional when they came to know jelindar shendage ill.)
जालिंदर शेंडगे हे अजित पवार यांच्या लहानपणापासून पवार कुटूंबाच्या सेवेत आहेत. ‘अजितदादा’ लहान असताना त्यांना सायकलने शाळेत पोहोचवण्याचे काम शेंडगे करत होते. अजितदादा आमदार झाले, खासदार झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.मात्र, कुटुंबिय,मित्र,नातेवाईकांसह बारामतीकरांबाबत त्यांचा तोच जिव्हाळा कायम राहिला. जालिंदर शेंडगे देखील त्याला अपवाद नाहित. त्यांच्याशी दादांचा तोच ऋणानुबंध आजही कायम आहे.
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभुमीवर ‘अजितदादां’चा दिनक्रम अतिशय व्यस्त आहे, कामाचा धडाका सुरू आहे. त्याचवेळी एका कार्यक्रमात दादांना निरोप येतो, ‘जालिंदर खूप आजारी आहे.’ तो निरोप ऐकताच दादांच्यातील नेत्यांवर कुटुंबप्रमुख विजय मिळवतो. दादा तिथूनच फोनाफोनी सुरू करतात. ‘काहीही करा पण जालिंदरला बर करा.’ दादा जिव्हाळ्याने सांगत राहतात. जालिंदर जोवर दवाखान्यात जात नाही तोवर स्वत: पाठपुरावा करत राहतात. जालिंदरवर उपचार सुरू झाल्यावरच दादांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळतो.
गेली काही वर्षे सोबत असल्याने मलाही समजत आता दादा तणावात नाहीत. या काळात तसच झालं. कडक कणखर दादांच्यातील संवेदनशील कुटुंबप्रमुख बघितल्याचे मुसळे यांनी सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये नमुद केले आहे. उपमुख्यमंत्री असणाऱ्या दादांची कुटूंबवत्सलता मला खूप भावली आहे.कुटूंबासाठी दादा किती संवेदनशील आहेत याचे अनेक अनुभव त्यांचा पीए म्हणून मला सांगता येतील.पण दादांचे कुटुंब हे खूप व्याप्त आहे.त्यात चुलते, पत्नी, मुले भाऊ,पुतणे,असा मोठा परिवार आहेच .पण दादांच्या कुटूंबात दादांच्या घरातील सर्व नोकर,त्यांची मुले, त्यांचे नातेवाईक असतात.दादा कितीही व्यस्त असले तरी ते आपला कुटुंबवत्सल स्वभाव सोडत नाहीत.त्यांचे वात्सल्य तेच राहते, असे मुसळे यांनी या पोस्टमध्ये नमुद केले आहे.