मिठाचा खडा टाकू नका; तिन्ही पक्षांनी समन्वय ठेवावा, अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 06:04 AM2021-03-29T06:04:11+5:302021-03-29T06:04:52+5:30
Ajit Pawar Criticize Sanjay Raut : अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.
मुंबई : अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले असल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेतला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य करत राऊत यांना अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, असा इशारावजा सल्ला अजित पवारांनी राऊत यांना दिला.
जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे, दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही, असे राऊत म्हणाले होते.
त्यावर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री कोण होणार, याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थाने काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना सुनावले.
सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधाने करू नयेत. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही पवार म्हणाले.
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे, या राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनीही समाचार घेतला होता. राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल त्यांनी केला होता. शिवसेना हा युपीएचा घटक पक्षही नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता त्यांनी करु नये, असेही पटोले यांनी बजावले होते.