मुंबई : विकास, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजीनगर येथील जाहीर सभेत केली.
उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ शिवाजी नगर येथे आलेल्या पवार यांनी मोदी यांच्या हिंदुत्ववादी प्रचाराने देशात जातीय तेढ निर्माण होतेय, दोन धर्मांमधली दरी वाढतेय, असेही स्पष्ट केले. मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ साध्वी प्रज्ञा सिंगला भाजपाने उमेदवारी दिल्याचा आरोप करत शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून पवार यांनी साध्वी आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी नोटाबंदी, जीएसटी सारखी मोदींनी राबविलेली धोरणे अपयशी ठरली आहेत. सर्वसामान्यांसह लघु-उद्योजकांचे यामध्ये कंबरडे मोडले आहे. आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्थेतही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने देश अराजकतेकडे चालला असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खारघरमध्ये केली होती.
देशात कधी नव्हे ते सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेपाचा पाढा वाचला, तसेच रिझर्व्ह कामकाजातही मोदी सरकारने हस्तक्षेप केल्याने रिझर्व्ह बँकेचे गव्हरर्नर ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे या वेळी नमूद केले. काँग्रेसच्या राजवटीत सरकारने शेतकऱ्यांचा ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. तुम्ही काय केले? याचे उत्तर द्या. जवाहरलाल नेहरू, गांधी कुटुंबीयांनी देशासाठी काय केले? हा प्रश्न मोदी विचारत आहेत. राजीव गांधींनी देशात तंत्रज्ञान, दळणवळण तसेच आधुनिकता आणली, हे विसरता येणार नसल्याचे ते म्हणाले. मोदी हे हिंदुत्वाचा प्रचार करतात. पंतप्रधान कुठल्या एका धर्माचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो, याचा उल्लेख त्यांनी अखेरीस केला.