मुंबई : आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहे, अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमवेतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
सोनिया गांधी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने साधलेल्या संवादात ठाकरे यांनी ही भावना व्यक्त केली. याला पंजाबचे कॅ. अमरिंदर सिंग, राजस्थानचे अशोक गेहलोत, पुदुच्चेरीचे नारायण सामी, छत्तीसगडचे भूपेश बघेल, झारखंडचे हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी हे मुख्यमंत्रीही सहभागी होते.
यावेळी ठाकरे म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे फेडरल स्ट्रक्चर लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली आहे. त्यात सर्वांना अधिकार दिले आहेत. जर आपण त्याचा आदर करणार नाही, तर मग आपल्याकडे लोकशाही कुठे आहे? आपल्याला एकत्र यायला संकटाची गरज कशाला हवीे? आपण एरवीसुद्धा भेटले पाहिजे. ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. एक बार तय करो डरना है, या लढना है, असे म्हणत ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला.लढनेवाले बाप का बेटा हूं ।मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे सोनिया गांधी यांनी उद्धव यांना आधी बोलण्याची संधी दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्र्जींकडे ‘इजाजत’ मागितली. ममता म्हणाल्या, उद्धव जी आप बहुत अच्छा फाइट कर रहे है.. ठाकरे त्यावर म्हणाले, लढने वाले बाप का लढने वाला बेटा हूं..!