Bharat Gogawale Snehal Jagtap: आपल्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले हे एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष झालेले भरत गोगावले सध्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाड येथील एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले त्यांनी स्नेहल जगतापांबद्दल अर्वाच्च शब्द वापरला.
भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान काय?
महाड येथील कार्यक्रमात बोलत असताना भरत गोगावले म्हणाले, "आम्ही प्रत्येक गावात विकास... तुम्हाला काय पाहिजे? काम करणारा भाऊ पाहिजे की, चु## बनवणारी बहीण पाहिजे? हे लक्षात ठेवा."
स्नेहल जगताप काय म्हणाल्या?
भरत गोगावले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या स्नेहल जगताप म्हणाल्या, "बेताल वक्तव्य केलं की मला एक वेगळीच प्रसिद्धी मिळते. बेताल वक्तव्य करून प्रसिद्ध मिळवण्याचे त्यांचे हे खूप जूने नाटकं आहेत. एकीकडे महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे महिला वर्गाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करायचं, हे निंदनीय आहे. मुख्यमंत्र्यांना हे आव्हान असणार आहे की, तुमच्या पक्षाच्या प्रतोदांनी जे वक्तव्य केलं आहे, त्याच्यावरती आपण गंभीर गुन्हा दाखल करणार आहात का? तो करणार नसाल, तर त्याबाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे, हे समस्त महिला वर्गाला दाखवून द्या", असे आव्हान स्नेहल जगताप यांनी शिंदे यांना दिले आहे.
विजय वडेट्टीवार यांची टीका
"एकनाथ शिंदे आणि त्यांच्या फेकसेनेचा हा खरा चेहरा आहे! मतांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून इव्हेंट करत आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदार एका महिलेला भर सभेत शिव्या घालत आहे", अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
"मुख्यमंत्री महोदय, तुमच्या लाडक्या बहिणीला शिव्या घालणाऱ्या भरत गोगावले यांच्यावर कारवाई करून दाखवा. बहिणीची अब्रू महत्वाची की खुर्चीसाठी तुम्हाला पाठिंबा देणारा आमदार महत्वाचा हे आज राज्याला दाखवून द्या", असे आव्हान वडेट्टीवार यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.