नाशिक – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळालं. शिवसेना-भाजपा युतीत लढणारे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून वेगळे झाले. विधानसभा निवडणुका एकत्र लढणारे निकालानंतर वेगळे झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक वर्ष एकमेकांविरोधात लढलेले कट्टर शत्रू एकत्र येत सत्ता स्थापन केली.
आता ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी उपमुख्यमंत्रीअजित पवार(Ajit Pawar) यांना विचारला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता अजितदादांनी नाही वाटत असं उत्तर दिलं. उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ५ वर्ष तेच राहतील असं अजितदादांनी स्पष्ट सांगितले.
नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यात एका पत्रकाराने अजितदादांना वेगळाच प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल, प्रमोशन होऊन मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न केला. त्यावरून अजित पवार म्हणाले की, मला प्रमोशन व्हावं असं वाटत नाही. तुम्हीही पत्रकार आहात, तुम्हालाही संपादक व्हावं वाटतं. पण सर्वजण संपादक होत नाहीत. एकच व्यक्ती संपादक असतो. आमच्याकडे १४५ मध्ये एकच मुख्यमंत्री होतो, तो आम्ही बसवलेला आहे. तोही ५ वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे ५ वर्ष तरी याचा विचार करायचा नाही असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.
‘हे’ नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार
महाविकास आघाडी स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी बैठकीत निर्णय घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळतील असं ठरवलं आहे. जोपर्यंत हे नेते सांगतील तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. शरद पवारांनी ५ वर्ष सरकार चालेल हे स्पष्ट सांगितले आहे. सोनिया गांधी यांचीही हे सरकार ५ वर्ष चालावं अशी इच्छा असल्याचं नाना पटोले, बाळासाहेब थोरात म्हणतात. त्यामुळे सरकारमध्ये काही आलबेल नाही अशा बातम्या मुद्दामाहून सोडल्या जातात. त्यात काही तथ्य नसतं असं अजित पवार म्हणाले आहेत.