मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरोधात जनआंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले. यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना टोला लगावला आहे. (bjp prasad lad taunt bhai jagtap over collapses from bullock cart while protesting)
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!
‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार! भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढंचं करावं!” असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. तसेच यासंदर्भातील व्हिडिओही शेअर केला आहे.
“तोल सांभाळा! ...अन्यथा राज्याच्या राजकारणातही काँग्रेस कोसळेल”
तसे राज्याच्या राजकारणातही होईल
तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.