मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का...?; देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:09 PM2021-03-03T13:09:32+5:302021-03-03T13:14:20+5:30
Maharashtra Budget Session 2021: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची मागणी
तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू केली होती. त्यांनी राज्यात रावबलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी विधीमंडळाची समिती स्थापन करण्यात येणार येणार असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तरात कोणताही घोळ नसल्याचं म्हटलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का असा सवालही केला.
"सध्या ७५ टक्के वृक्ष जीवंत आहे. खरं तर ६० टक्क्यांचा दर अपेक्षित असतो. हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे. त्यावरच आता हे लोकं समितीही स्थापन करणार. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मंत्र्यांचा विश्वास नाहीये का?, किंवा मुख्यमंत्र्यांना याची माहितीच नाहीये का?," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांना चुकीचं ब्रिफिंग होतंय का? मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. राजकीय आखाड्यासारखा या सभागृहाचा वापर केला. आम्हाला अडचण नाही. पण राजकीय आखाड्यासारखा उपयोग करणं योग्य नाही. फक्त तुमच्या मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे की नाही हे सांगावं, असंही त्यांनी नमूद केलं.
नाना पटोलेंची मागणी
वृक्ष लागवडीबाबत विधीमंडळाच्या समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसंच ही समिती सहा महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी तब्बल २ हजार ४२९ कोटी रूपयांचा निधीही खर्च झाला होता.