संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:21 PM2024-09-20T17:21:14+5:302024-09-20T17:29:12+5:30
Nana Patole Sanjay Raut : बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असे विधान केले. त्याला उत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावले. राऊतांच्या विधानाची चर्चा सुरू असतानाच नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर देत पडदा टाकला.
Nana Patole : "काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या, पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या जागा वाढवण्यात शिवसेनेचे योगदान किती आहे", अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले. राऊतांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एका वाक्यात उत्तर दिले.
नाना पटोले राऊतांबद्दल काय बोलले?
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, "संजय राऊतांचे तुम्ही फार काही ऐकत जाऊ नका. आमचा काहीच वाद नाहीये. पण, संजय राऊतांचे तुम्ही फार काही ऐकू नका. त्यांच्या तोंडून अनावधानाने निघाले आणि त्यांनी ते मान्य केले."
"काल पत्रकार परिषदेत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सांगितले की, 'काँग्रेसच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले.' आणि आजची महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे, त्यात काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे", असे उत्तर नाना पटोलेंनी दिले.
बाळासाहेब थोरात यांनी मांडली भूमिका
तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "आघाडी आहोत. काय करायचे याचा एकमताने निर्णय घेऊ. एकमेकांमुळे आमच्या जागा वाढल्या, हे खरे आहे. मी महाविकास आघाडी हा शब्द वापरला होता. काँग्रेसचा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असेच मी म्हणालो होतो. त्यात काहीही वावगं नाही. यावरून जागावटपात तिढा निर्माण होणार नाही", अशी भूमिका थोरातांनी मांडली.
महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा
जागावाटपाचा मुद्दा निकाली लावण्यासाठी तीन दिवस महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक मुंबई झाली. या बैठकीत मुंबईसह इतर विभागातील जागावाटपावरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसच्या मुंबईत आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून अशा काही जागांची मागणी करण्यात आली आहे, ज्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला आहे.
मुंबईत शिवसेनेचे तीन खासदार निवडून आले आहेत. तर अमोल कीर्तिकर हे थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जास्त जागांची मागणी केली जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेने २२ जागा मागितल्या आहेत, तर काँग्रेसने १८ जागांवर दावा केला आहे.