- अतुल कुलकर्णी
मुंबई : शिवसेनेसोबत कधी सरकार बनवू असे आपल्याला वाटले नव्हते. मात्र, महाराष्ट्रात आपण वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले. हे सरकार किती दिवस टिकेल याविषयी शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, आणि पुढेही लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्षाच्या २२व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. पवार म्हणाले, महाराष्ट्रात आपण एका वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे. कधी कोणाला वाटलेही नव्हते की शिवसेना आणि आपण एकत्र काम करू. पण आपण पर्याय दिला आणि सुदैवाने हा पर्याय लोकांनीही स्वीकारला.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य दिशेने पावले टाकत सरकार चालवले आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले, त्यावेळी माध्यमांनी हे सरकार किती महिने, किती दिवस टिकेल यावरून चर्चेचे गुऱ्हाळ चालवले. परंतु सरकारने दोन वर्षांचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केला.
शिवसेनेसोबतचा अनुभव विश्वासाचा शिवसेनेसोबतचा माझा यापूर्वीचा अनुभव विश्वासाचा आहे. देशात जनता पक्षाचे राज्य येऊन गेल्यानंतर देशात ठिकठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला असताना, शिवसेना हा एकमेव पक्ष काँग्रेसला मदत करण्यासाठी पुढे आला आणि विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढविली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता, आणि त्या शब्दाला ते जागले. त्या कालखंडात शिवसेनेने जी भक्कम भूमिका घेतली, त्या भूमिकेला सोडण्याची वागणूक आता होईल असे वाटणारे वेगळ्या नंदनवनात वावरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदी-ठाकरे भेटीबद्दल...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा संदर्भ देत ते म्हणाले, की राज्यातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची व्यक्तिगत भेट झाली. त्यानंतर पुन्हा वावड्या उठवणे सुरू झाले. कोणी काही म्हणो, अशा चर्चांचा यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. कारण हे सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिघांचे आहे.
सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होतेमराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे आणि हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एसी, एसटी आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे याची काळजी आपण घेऊया.
शिवभोजनचे कौतुकशिवभोजन थाळी योजनेचा आवर्जून उल्लेख करीत यामुळे कितीतरी गोरगरिबांच्या जेवणाची लॉकडाऊनच्या काळात सोय झाली, असे शरद पवार म्हणाले.