पुणे – गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि माजी खासदार राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु अचानक त्यांची तब्येत खालावली. सातव यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीनं त्यांना पुण्यातून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Congress leader Rajiv Satav health has deteriorated)
राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत ते हिंगोलीचे माजी खासदार आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटे असतानाही ते निवडून आले होते. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी आहे.
राजीव सातव यांची तब्येत खालावल्याचं कळताच स्वत: राहुल गांधींनी फोन करून डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे. तसेच राज्यमंत्री विश्वजित कदम सध्या सातव यांच्यासोबत आहेत. राजीव सातव यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात यापुढचे उपचार होतील असं सांगितलं जात आहे.