चेन्नई : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट प्रचारकांनी देखील रंग भरले आहेत. नेत्यांसारखी स्टाईल करून त्यांच्यासारखी संवाद फेक करत हे डुप्लिकेट आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत फिरत आहेत. एकाच राजकीय पक्षाशी बांधील नसणाऱ्या या डुप्लिकेट व्यक्तींना निवडणुकांमध्ये रोजगारांची संधी मिळाली आहे. तर प्रमुख राजकीय नेत्यांना डुप्लिकेटमुळे काही प्रमाणात प्रचारातील व्यस्त वेळापत्रकातून थोडासा आरामदेखील मिळत आहे.तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मंगळवारी ६ एप्रिलला मतदान होत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच राजकीय पक्षांना अवघे १४ दिवस प्रचाराला मिळाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किंवा मतदारसंघात जाणे नेत्यांना शक्य झालेले नाही. अशावेळी त्यांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट व्यक्तिरेखांची मदत झाली. तमिळनाडूच्या विविध शहरांत सध्या एमजीआर, करुणानिधी, जयललिता यांचे डुप्लिकेटदेखील प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. ते प्रचारसभेत खऱ्याखुऱ्या नेत्याप्रमाणे स्टाईल करत जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. रजनी मनी हा रजनीकांत यांचा डुप्लिकेट गेली २५ वर्षे डुप्लिकेट रजनीकांत म्हणून वावरत आहे. रजनीकांत यांच्यासारखे दिसणारे ५० ते ६० कलाकार ते निवडणुकीत सहभागी होतील या आशेवर होते पण ते निवडणुकीपासून लांब राहिल्याने डुप्लिकेटांचा भ्रमनिरास झाल्याचे मनी यांनी सांगितले. या कलाकारांना सर्वसाधारणपणे २००० ते ५००० रुपये असे मानधन काही तासांसाठी मिळते. कोरोनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटात हे मानधनदेखील चांगले असल्याचे डुप्लिकेट कलाकारांनी सांगितलेे. सध्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन, एमजीआर, जयललिता यांच्या डुप्लिकेटांना जास्त मागणी आहे.
डुप्लिकेट नेत्यांनी प्रचारात भरले रंग, स्टॅलिन, एमजीआर, जयललिता यांच्या डुप्लिकेटस् ना जास्त मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:54 AM