दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:18 PM2024-10-07T13:18:52+5:302024-10-07T13:23:51+5:30

Dattatray Bharne Harshvardhan Patil: इंदापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरामुळे बदलले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे यांचा निसटता विजय झाला होता. सलग दोन वेळा इंदापुरात गुलाल उधळलेल्या भरणे यांना निवडणूक जाणार असे दिसत आहे.  

Dutta Bharan's Assembly Constituency In 'Red Zone', Indapur Political Equation Changed, See What The Figures Say? | दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

Indapur Vidhan Sabha Elections 2024 Prediction: सलग दोन वेळा आमदारकीचा गुलाल उधळलेल्या दत्ता भरणे यांच्यासाठी यावेळी विधानसभा निवडणूक जड जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेची सुरूवात लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून झाली. इंदापूरमधील भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने सगळी राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे भरणे यांना निवडणूक जड जाणार, या चर्चेची कारणं समजून घ्या...

अजित पवारांसोबत गेलेले नेते शरद पवारांच्या 'रडार'वर

२०१४ मध्ये दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विधानसभा गाठली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय मिळवला होता. सलग दोन वेळा विजयी झालेल्या दत्ता भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांवर शरद पवारांनी जास्त लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसत आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफांविरोधात शरद पवारांनी पर्याय उभा केला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधातही शरद पवारांनी त्यांच्या कन्येलाच मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधातही शरद पवारांनी गायत्री शिंगणे यांना ताकद दिली आहे. आता दत्ता भरणे यांच्याविरोधात शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना सोबत घेत अजित पवारांच्या उमेदवाराची चिंता वाढवली आहे. 

दत्ता भरणेंचा 2019 मध्ये निसटता विजय?

इंदापूर मतदारसंघात दत्ता भरणे यांच्याबरोबरच हर्षवर्धन पाटील यांचेही वर्चस्व आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे हे विजयी झाले होते. पण, त्यांना अवघ्या ३,११० मतांची आघाडी मिळाली होती. दत्ता भरणे यांना १,१४,९६० मते मिळाली होती. भाजपाकडून निवडणूक लढवलेल्या हर्षवर्धन पाटील यांना १,११,८५० मते मिळाली होती.

लोकसभेला सुप्रिया सुळेंना आघाडी

बारामती लोकसभा मतदारसंघातून यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळेंना खडकवासला विधानसभा मतदारसंघ सोडला, तर उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं होतं. 

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून १ लाख १४ हजार २० मते मिळाली होती, तर सुनेत्रा पवार यांना ८८ हजार ६९ मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५ हजार ९५१ मताधिक्य मिळाले होते. 

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांनी आता विधानसभा निवडणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये होते. हर्षवर्धन पाटलांनीही अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंना ताकद दिली होती. त्यामुळे अजित पवारांना बारामतीची निवडणूक जड गेली. 

इंदापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाने बदलली आहे. इंदापूर मतदारसंघातील स्थानिक संघर्ष, हर्षवर्धन पाटील यांची ताकद आणि शरद पवार फॅक्टर, हे तिन्ही घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. 

गेल्यावेळीच दत्ता भरणे यांना निवडणूक जड गेली होती. लोकसभेला शरद पवारांच्या उमेदवाराला २५ हजारांची लीड मिळाली. त्यामुळेच दत्ता भरणे यांची जागा 'रेड झोन'मध्ये असल्याचं इंदापूर मतदारसंघात आणि राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Dutta Bharan's Assembly Constituency In 'Red Zone', Indapur Political Equation Changed, See What The Figures Say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.