मुंबई : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या घडामोडींमध्ये त्यांच्या हातातून जनता दलाकडे गेला. त्यानंतर मात्र येथील मतदारांनी कधी सेना-भाजप तर, कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिलेला आहे. गेल्या तीन वर्षांत आघाडी आणि युती अशी थेट लढत या भागात असल्याने, ९० टक्के अपक्षांना त्यांची खातीही वाचविता आली नसल्याचे दिसून येते.२००४ मध्ये गुरुदास कामत यांनी एक लाख मतांनी विजय मिळवत, किरीट सोमय्यांचा पराभव केला. २००९ मध्ये सोमय्या यांना हरवत राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनी २ हजार ९३३ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर सोमय्या यांनी मोदी लाटेमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वापाच लाख मते मिळवून विजय मिळवला होता. यंदाही आघाडी आणि युतीच्या उमेदवारांमध्येच थेट लढत आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांचा प्रभाव कमी पडताना दिसत आहे. यादरम्यान अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उभे राहिलेल्या ९० टक्के उमेदवारांना त्यांचे खाते वाचेल इतकीही मते न मिळाल्याचे चित्र गेल्या ३ निवडणुकींच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यंदाही थेट लढत असल्याने मतदार या उमेदवारांना किती साथ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.>डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.
उत्तर पूर्व मुंबईत अपक्ष उमेदवार बुडीतच, प्रमुख उमेदवारांपुढे प्रचार पडतो फिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:55 AM