मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
दरम्यान, सरनाईक हे परदेशात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते मुंबईत आहेत. यामुळे सरनाईक आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. तर त्यांचा मुलगा विहंगला आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही सेना नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि राज्यातील उर्वरित भागात राजकीयदृष्ट्या कार्यरत असलेल्या पण विविध व्यवसायांत शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या या नेत्यांच्या व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. त्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहार असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे, असे ईडीतील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
विहंग सरनाईकांवर प्रश्नांची सरबत्तीप्रताप सरनाईक यांचे पुत्र व टॉप ग्रुपचे संचालक असलेल्या विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेले. त्यांच्याकडे व्यवसाय आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीबद्दल विचारणा करण्यात आली. बँक खाती आणि त्यावरील व्यवहारांबद्दल त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.