जळगाव : एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लगेचच जळगाव भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते.
खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. भाजप कोअर कमिटीच्या वतीने तातडीनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष आदींची उपस्थिती होती. पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीनं वरिष्ठ नेत्यांकडून या बैठकीत चाचपणी करण्यात आली.
या बैठकीला खासदार येतात का, याकडेच साऱ्यांचे लक्ष होते. मात्र, त्या आल्या नाहीत. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी गठीत करणे राहिले होते. कोअर कमिटीची बैठक ही नियमित स्वरूपाची होती. कार्यकारिणी बनविण्यापूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घ्यायचे होते. पक्षसंघटन मजबुतीसाठी चाचपणी सुरू आहे.
एकनाथ खडसेंच्या पक्षांतराने भाजपमध्ये कोणतेही खिंडार पडणार नाही. कोणताही आमदार, खासदार किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती सापेक्ष पक्ष नाही, असे महाजन यांनी सांगितले. क्षा खडसे अनुपस्थितीवर महाजन यांनी सांगितले की, त्या पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना बैठकीला उपस्थित राहाता आले नाही.
महत्वाचे म्हणजे भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे मुक्ताईनगरला आले होते. येथील निवासस्थानी रविवारी दुपारी खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले होते. खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते. तर रक्षा खडसे यांनी ही भाजपात राहणार असल्याचे सांगितले होते.