जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे रुग्णालयात दाखल झाल्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संशय व्यक्त केला असून, ते खरोखर रुग्णालयात दाखल आहेत का? असा प्रश्न त्यांनी ट्विट करून उपस्थित केला आहे. हा खोटेपणा असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खडसेंना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. तसेच खडसे यांचा अपंग दाखला रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी आंदोलन केले. खडसे सोमवारी मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते अतिदक्षता विभागात दाखल असून, त्यांच्यावर किडनीची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितले जात आहे. दमानिया यांनी ट्विट करीत म्हटले आहे हा खोटेपणाचा कळस आहे. न्यायालयासमोर हजर न राहण्यासाठी हे खोटे सांगितले जात आहे.