मुंबई – भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे सध्या सोशल मीडियात भलतेच ट्रोल होऊ लागले आहेत. एकनाथ खडसेंनी दिलेला राजीनामा सर्वत्र व्हायरल होत आहे. हा राजीनामा फेटाळण्याची मागणी केली जाऊ लागली. त्याला कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी लिहिलेल्या २ ओळींच्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी खडसेंना ट्रोल केलं आहे.
एकनाथ खडसेंचा राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी ते गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. मात्र २ ओळींचा राजीनामा देताना पत्रात किती चुका असाव्यात? असा प्रश्न संतप्त नेटकऱ्यांनी विचारला आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत सोशल मीडियात आवाज उठवल्यानंतर नेटकऱ्यांनी एकनाथ खडसेंना चांगलेच धारेवर धरलं आहे.
बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार
हेरंब कुलकर्णी यांनी या पत्राबाबत म्हटलंय की,
१) प्रती शब्द प्रति हवा
२)वैयक्तीक शब्द वैयक्तिक हवा
३)प्राथमीक शब्द प्राथमिक हवा
४)ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको
५) पत्राच्या वर महसुल शब्द महसूल हवा
६) कृषीमंत्री शब्द कसा लिहावा?
७) विधानसभा हा शब्द जोडून हवा
सध्या सोशल मीडियात खडसेंच्या राजीनाम्याचं पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्स भाजपाची तसेच एकनाथ खडसेंची फिरकी घेत आहेत. बहुतेक या पत्राची केंद्र सरकारकडून सीबीआय चौकशी होणार असे विनोद केले जात आहेत. तर काहींनी मंत्रिपदावरील व्यक्ती ज्याला मराठी लिहिता येत नसेल तर मराठीत बोला सांगण्याचा आपल्याला हक्क आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
एकनाथ खडसेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. एकनाथ खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपातच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.