जळगाव : भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा असून ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. या भेट कोणत्या कारणसाठी झाली. याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विशेष म्हणजे, विश्रामगृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले. त्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या चारही मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या ठिकाणी कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख हे एकत्र पोहोचले.
दरम्यान, घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट रावेर तालुक्यातील घटनेवरून सरकारवर टीका केली. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश बारगळला की विजयादशमीचा मुहूर्त ते साधणार? अशी चर्चा रंगली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले...या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरविले आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. शिवाय, त्यांनी रावेर तालुक्यातील घटनेवरून सरकारवर टीकाही केली.
खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती नाही - अजित पवार राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली.