मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत तर राष्ट्रवादीनंही कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.
जळगावमधून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असतील, तर खडसे समर्थक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. तुर्तास एकनाथ खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी भाजपामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ खडसेंसोबत भाजपाचे काही माजी आमदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं
तसेच पुढील येणाऱ्या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. राजीनामा देऊन कोरोना काळात विधानसभा निवडणुका घेणं शक्य नसल्याने हळूहळू त्याबाबत निर्णय होईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत ते नंतर येतील, एकनाथ खडसेंसोबत कोण येणार याबाबत फारशी चर्चा केली नाही, खडसेंचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे ते सगळी लोकं राष्ट्रवादीत येतील असाही गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला आहे.
एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?
१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)
२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.
विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.