-जितेंद्र ढवळेAshish Jaiswal Eknath Shinde Shiv Sena: महायुतीत रामटेकची जागा कोण लढेल, यावरून खल होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर करीत भाजपमधील इच्छुकांना धक्का दिला. रामटेक मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी शिंदे यांच्याहस्ते पारशिवनी येथे करण्यात आले. या सभेत जयस्वाल यांच्या मागणीवरून शिंदे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली.
२०१९ च्या निवडणुकीत युती धर्माचे पालन न करत आशीष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. ते विजयी झाले होते. मात्र, यावेळी त्यांना महायुतीची उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांची होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र भाजपचा विरोध असतानाही जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने भाजपमधील इच्छुकांना धक्का बसला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आशिष जयस्वाल हे पूर्वीपासून शिवसेनेतच आहेत. ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी सरकारवर यावेळी विश्वास दाखवतील. ही योजना बंद होणार नाही तर यात आणखी वाढ होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष
महाविकास आघाडीतून रामटेकच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी राज्यातील प्रमुख नेते मुंबईत खिंड लढवित आहेत. आता महायुतीत रामटेकची जागा शिंदेसेनेला गेली असल्यामुळे महाविकास आघाडीत रामटेकची जागा कुणाच्या वाट्याला येईल, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.