लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमध्ये घुसमट सुरू आहे. ते केवळ सहीपुरतेच उरले आहेत. नगरविकास खात्याचा कारभार मातोश्रीवरूनच चालतो. यामुळे शिंदे हे वेगळा मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी त्यांनी वसई- विरार शहराचा दौरा केला. गोमूत्र शिंपडण्याचे उद्योग करण्यापेक्षा रोजगार देण्याचे व्यवसाय करा, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला केला. भरपावसात काढलेल्या या यात्रेला मोठी गर्दी जमली होती. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामेही उद्धव ठाकरे यांनी केेलेली नसल्याचे ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते. त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांवर टीका केली. शुद्धीकरणाचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करा, असे ते म्हणाले. मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे, असा टोला त्यांनी लगावला. मी घरात बसून काम करत नाही किंवा व्यासपीठावर डावी-उजवीकडे बघून उत्तरे देत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांची खिल्ली उडवली. या यात्रेदरम्यान राणे यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शनिवारी मुसळधार पाऊस असल्याने राणे यांना उघड्या जीपऐवजी गाडीत बसून यात्रा काढावी लागली. संध्याकाळी राणे यांनी वसईच्या चिमाजी अप्पा स्मारकाला भेट दिली.
भर पावसात तारपा नृत्य व बेंजोची नाचगाणीवसई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने राज्यभर सध्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेला भरपावसात शनिवारी दुपारी सुरुवात झाली. ढोल, बेंजो आणि आदिवासींच्या तारपा नृत्याने केंद्रीय मंत्री राणे यांचे वसईच्या वेशीवर शेकडो कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.