Uddhav Thackeray Eknath Shinde News: 'जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती आहे', असे विधान शरद पवारांनी इस्लापुरात बोलताना केले. इतकंच नाही, तर 'मी पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे", असेही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या विधानाने महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटीलही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, ही चर्चा सुरू झाली. त्यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. पण, विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाल्याचे दिसत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना डिवचले
शरद पवारांच्या विधानानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे. शिंदेंच्या शिवसेनेने एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची खुर्ची पवारांनी जयंत पाटलांकडे सरकावल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे खाली आपटले.
हे व्यंगचित्र पोस्ट करताना शिवसेनेने म्हटले आहे की, "या खुर्चीने दगा दिला ऐसा की, पद गेले, पतही गेली. पदाविना सत्ता गेली, सत्तेविना मलिदा गेला", असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून डिवचले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका काय?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी विधाने केली गेली. तर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, कोणाचाही चेहरा जाहीर करावा, माझा त्याला पाठिंबा असेल. त्यावर ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असे काँग्रेसचे नेते म्हणाले. मात्र, शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडली. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यावर निर्णय घेऊन अशी भूमिका पवारांनी मांडलेली आहे.