नवी दिल्ली: कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Election 2022) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. निवडणूक जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले असावे, असे सांगितले जात आहे. याचे महत्त्वाच कारण म्हणजे १४ फेब्रुवारी ही तारीख. अरविंद केजरीवाल यांच्यासाठी १४ फेब्रुवारी ही तारीख खूपच लकी असल्याचे म्हटले जाते.
गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १४ फेब्रुवारी ही तारीख अरविंद केजरीवाल यांच्यासाठी लकी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याच दिवशी केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली होती. यावेळी ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपसह अन्य पक्षांचा सूफडा साफ केला होता. तेव्हा दिल्लीच्या जनतेसोबत कायम व्हेलेंटाइन डे साजरा करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.
१४ फेब्रुवारी रोजी दिला होता राजीनामा
अरविंद केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारी या तारखेलाच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. दिल्लीच्या जनतेने पुन्हा संधी दिली, तर १४ फेब्रुवारी याच तारखेला सत्ता स्थापन करण्याची घोषणा केजरीवाल यांनी त्यावेळी केली होती. आपला शब्द पाळत केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन केले होते. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती अन्य राज्यांमध्ये करण्याची संधी यानिमित्ताने केजरीवाल यांना चालून आल्याचे म्हटले जात आहे. पंजाब आणि गोव्यामध्ये केजरीवाल ताकदीनिशी मैदानात उतरत आहे. गोव्यापेक्षा पंजाबवर केजरीवाल यांचे अधिक लक्ष केंद्रीत असेल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी या दोन्ही राज्यांमध्ये मतदान होत असल्यामुळे केजरीवाल यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे सांगितले जात आहे. गोवा आणि पंजाबमधील जनतेसाठी अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आता १४ फेब्रुवारी रोजी मतदार केजरीवाल यांच्या पारड्यात दान टाकणार की, पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचाच सुफडा साफ होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.