मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत चालले आहे. भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. मात्र, यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या दलित कुटुंबाच्या घरी जेवण केल्यावरून जोरदार टोला लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा सगळा देखावा असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुरमधील एका दलित कुटुंबाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी झूमिया गेट येथील गोरखपूर फर्टिलायझरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता असणाऱ्या अमृतलाल भारती यांच्या घरी जेवण केले. यावेळेस योगींनी सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. योगींच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे. यावरूनच आता नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीका केली आहे.
धन्य आहात महाराज
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन योगी आदित्यनाथांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. पत्रावळी आणि कुल्हडवरुनच दलिताच्या घरी जेवण करणे हा केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट होत आहे. असे ऐकण्यात आले आहे की, स्वयंपाक करणारा आणि जेवणाची व्यवस्थाही भाजपने केली होती. धन्य आहात महाराज, असे ट्विट नवाब मलिक यांनी केली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ४०३ जागांवर सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार असून, सात मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यांमध्ये मतदान होईल. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दुसरीकडे, भाजपला एकावर एक धक्के बसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या अनेक मंत्री, आमदारांनी पक्षाला रामराम करत विविध पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.