लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम (UP Election 2022) जाहीर झाल्यापासून सर्व विरोधी पक्ष भाजपला घेरण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखताना दिसत आहे. यातच भाजपला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. गेल्या ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांनी पक्षाला रामराम केल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर उत्तर प्रदेशमधील एका बड्या नेत्याने ही तर सुरुवात असून, योगी आदित्यनाथ सरकारमधील १८ मंत्री राजीनामे देणार असल्याचा मोठा दावा केला आहे. या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाल्याची चर्चा रंगली आहे.
ओबीसी नेते व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी सदर दावा केला आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एक-दोन नाही तर, दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत आणि भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे, असे राजभर यांनी नमूद केले आहे.
२० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील
१४ तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. राज्यपालांकडे राजीनाम्यासाठी लाइन लागणार आहे. २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील, असा दावा राजभर यांनी केला आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी एखादी भूमिका घेतल्यास समाज त्यांच्यामागे उभा राहतो. गेल्या निवडणुकीत ते भाजपसोबत गेले आणि भाजपला समाजाची साथ मिळाली. आता ते जे भूमिका घेतील त्यालाही समाजाची निश्चितच साथ मिळेल. उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे, बसपा बेदखल आहे आणि भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हीच ओळखा, असेही राजभर म्हणाले.
दरम्यान, योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यासोबत त्यांच्या तीन समर्थक आमदारांनीही भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर बुधवारी दारा सिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. त्यांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. राजभर हे जहुराबाद येथून निवडून आले होते. योगी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही दिले गेले होते. मात्र, २०१९ मध्ये राजभर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपचीही साथ सोडली होती.