मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) हळूहळू राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्व विरोधी पक्ष भाजपला घेरण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखताना दिसत आहे. यातच शिवसेनेनेही उत्तर प्रदेशमधील निवडणूक रिंगणात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात दंड थोपटणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून प्रचाराला सुरुवात करणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही कुठे लढायचे, किती जागांवर लढायचे हे ठरवणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केला
अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केला आहे. आम्ही त्या विषयाला चालना दिली. याचे श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. अयोध्येत मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. दोन चार दिवसांनी मथुरेत जाणार आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपले आस्तित्व दाखवायचे आहे. मला खात्री आहे की, यावेळी आम्ही ज्या पद्धतीने लढायचे ठरवले आहे, त्यामुळे आमचे सदस्य उत्तर प्रदेश विधानसभेत असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांना अयोध्येतून भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे.
गोवा आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन निश्चित आहे
लाटांचे तडाखे बसायला सुरूवात झाली आहे. सध्या मंद लाटा आहेत. पण त्या उसळू शकतात व जहाज हेलकावू शकते. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० जागा लढवेल. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. गोवा आणि उत्तर प्रदेशात परिवर्तन निश्चित आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
दरम्यान, सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एक-दोन नाही तर, दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत आणि भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे. २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील. भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे, म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हीच ओळखा, असा दावा उत्तर प्रदेशमधील ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.